किल्ले राजगड

११नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून द्यावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड'असे ठेवले.



२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत.

अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते - राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६