शब्दांविना गर्जे आमुचा दरारा!


चाकणसारख्या भुईकोटाने शाहिस्तेखानाला आणि त्याच्या फौजेला चांगले पाणी पाजले होते, तिथे डोंगरी किल्ल्यांकडे वाकडी नजर करुन बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती, पण औरंगजेबाचा खलिता वाचुन त्याच्या तोंडचे पाणी पळाले होते. शिवाजीचे स्वराज्य कसे संपवावे यावर पुण्याच्या लालमहालात बसुन आराखडे बनवले जात होते, आधी डोंगरी किल्ले घ्यावे की आधी कोकण किनारपट्टी जिंकुन घ्यावी. चाकणच्या किल्ल्याने शहाणा झालेल्या खानाने ठरवले, आधी कोकण किनारपट्टीवर आपला अंमल बसवावा. एकदा का कोकण किनारपट्टी मुघलांच्या ताब्यात आली की शिवाजीचे आरमार आपोआप संपुष्टात येईल. बेत ठरला, आधी कोकण.

खान अगदी एकांतात जाऊन बसला आणि त्याने आपला खास सरदार उझबेग कारतलबखान याला याद फर्मावले. कारतलबखानास त्याने चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणे हस्तगत करण्यास फर्मावले. आपल्या पराक्रमाने परिंडा किल्ला हस्तगत केलेल्या कारतलबखानाने हसत हसत ही मोहीम स्वीकारली. त्याच्याबरोबर कुमकेला खानाने मित्रसेन, कछप, सर्जेराव गाडे, जादोराव, अमरसिंह चौहान, जसवंतराव वगैरेंबरोबरच रायबाघनलापण कुच होण्यास सांगितले.

रायबाघन, एक ब्राह्मण स्त्री मोघल फौजेत सामिल झाली होती, तीचे खरे नाव होते, सावित्रीबाई, वऱ्हाडातील माहुरच्या राजे उद्धवराव देशमुखांच्या पत्नी. उद्धवराजांनी आमरण मोघलांची सेवा केली. त्यांचा पुत्र जगजीवनराव सुद्धा मोघल साम्राज्याकरता बळी पडला. घराण्यात पुरुष राज्यकर्ता कुणीच न राहिल्याने सावित्रीबाईने आपल्या एकटीच्या अधिपत्याखाली वऱ्हाड प्रांताचे परकिय आक्रमणापासुन संरक्षण केले, वऱ्हाड मोघली प्रांतातच राहिले. औरंगजेब बादशहाने खुश होऊन सावित्रीबाईला ’पंडिता’ आणि ’रायबाघन’ असे किताब बहाल केले. रायबाघन, राजव्याघ्रीण, वाघिणीसारखी शुर, चपळ, आपल्या भक्षाचा अचुक लचका तोडणारी.

आणि प्रचंड फौजफाटा घेऊन कोकणात हे सगळे निघाले कोकणात जायला तर फौज निघाली खरी, पण कोकणातले रस्ते कसे आहेत, नक्की कुठची वाट कोकणात घेऊन जाईल, हत्ती, तोफा जाऊ शकतील की नाही याची काहीही माहीती त्याला आणि त्याच्या फौजेला नव्हती. कारतलबखानचा सैन्यभार तळेगाववरुन मळवलीकडे सरकला. लोहगडाजवळुन त्याची फौज पुढे सरकत होती. ही वाट म्हणजे सह्याद्रीच्या अवघडपणाचे एक सुंदर उदाहरण होते, उंचच उंच डोंगर, आणि खोल खोल जाणाऱ्या दऱ्या. कोणाही नवख्यामाणसाला सह्याद्रीत नुसता पाय ठेवणे म्हणजे महाकठीण कर्म. ज्या वाटेने त्याची सेना मार्गक्रमण करत होती, तो मार्ग म्हणजे सह्याद्रीच्या लेकरांसाठी साधी सोपी पाऊलवाट. खानाच्या सैन्याला तर अफाट अरण्य व चहुकडे सह्याद्रीची उंच उंच शिखरे दिसत होती. येवढ्या कठिण वाटेने जाताना सैन्य पावलापावलावर थकत होतं. त्यातुन कारतलबखान त्याच्या बरोबर तोफा हत्ती उंट घेऊन लोहगडाच्या दक्षिणोत्तर असणाऱ्या वाटेवरुन खाली तुंगारण्यात उतरायचे आणि नंतर अख्खा सह्याद्री चढुन उंबरखिंडीतुन कोकणात उतरायचे अशा तयारीने आला होता. ही वाट तर अतिशय खडतर, दाट अभयारण्यातुन जाणारी, अतिशय कठिण डोंगरदऱ्यातुन जाणारी, अरुंद, निर्जन आणि महाभयानक होती. प्रत्यक्ष उंबरखिंडीत तर अतिशय घनदाट अरण्य होते, आणि खिंडीतुन जाणारी वाट इतकी दुर्गम होती, की एका वेळेला एकच माणुस त्या वाटेवरुन जाऊ शकत असे.
मोघल सैन्य वैतागले आणि घामाने चिंब भिजले होते

आणि दुसरीकडे राजांची ताजीतवानी फौज खानाचे आणि त्याच्या सैन्याचे होणारे हाल ऐकुन होती. खानाचे सैन्य तुंगारण्यात पोहोचण्यापुर्वीच मावळे जागोजागी लपुन बसले होते. विसापुर आणि लोहगडाच्या टप्प्यामधुन खान कोकणात उतरतो आहे, हे बधुन सुद्धा शिवरायांची फौज निवांत होती, एकदा का खान तुंगारण्यात उतरला की भयानक अरण्यात त्याच्या सैन्याला यथेच्छ झोडपुन काढायचे या इराद्याने शांत होती. उंबरखिंडीतील निसर्गसौंदर्य बघुन राजे तृप्त झाले. त्यांच्या सैन्याने मोक्याच्या जागा गाठल्या होत्या. उंच वृक्षांच्या गर्द पालवीत टेहळेकरी बसले होते. जंगलात जिथुन जिथुन वाट दिसेल, अशा ठिकाणी तोफांचे मोर्चे लावले गेले. राजे आता कारतलबखानाच्या सैन्याची आतुरतेने वाट पहात होते.

खानाने आपल्या फौजेला कुच करायची आज्ञा दिली. रायबागन एक शब्दही न बोलता सैन्याबरोबर चालु लागली. फौज कशीबशी अरण्याच्या ऐन मध्यावर आली आणि इतकावेळ असलेल्या भयानक शांततेला भंग करीत जबरदस्त तडाखा देणारी शिंगे किंचाळली. कारतलबखानाचे थकलेले सैन्य भीतीने चळाचळा कापु लागेले. सभोवार वळुन पहातात तर कोणीही दिसत नाही, मग शिंगांचे आवाज कुठुन येतात, ही भुताटकी तर नव्हे? इतक्यात नौबती वाजु लागल्या, आणि अचानक प्रत्येक झाडामागुन एक एक मावळा पुढे पुढे सरसावताना दिसु लागला. इतकावेळ शांतपणे झाडीत चढलेले, झाडांवर दडलेले, सांदीसपाटीत लपलेले शेकडो मावळे तलवारी उंचावुन हर हर महादेवचा जयघोष करत अंगावर धावुन गेले. अचानक झालेल्या हल्ल्याने गांगरुन गेलेली होती. खानाला या झालेल्या हल्ल्याला कसे तोंड द्यावे, काय करावे हे अजिबात कळत नव्हते, आणि त्यातच समोरुन नेताजी पालकर दौडत येताना दिसले.

कारतलबखानाच्या सैन्याची पुरती कोंडी झाली होती, तोंडाला कोरड पडली होती, कुठुन कुठचा बाण, भाला येईल आणि आपल्या कंठाचा भेद घेईल हे काही काही कळत नव्हते त्याच्या सैनिकांना. जिकडे बघावे तिकडे जंगल, आणि डोळ्यात रक्त उतरलेले मावळे याशिवाय काही काही दिसत नव्हते. सैन्याच्या पिछाडीला असलेल्या रायबागनकडे असहाय्यपणे पहात कारतलबखान सैन्याला यल्गार करण्याची आज्ञा देत होता, पण कोणा एकाच्या अंगात मावळ्यांच्या दिशेने एकही पाउल चालुन जाण्याइतका जोर नव्हता. तोच तोफेचा आवज साऱ्या अरण्यात दुमदुमला. तोफगोळ्यांच्या अचुक माऱ्यात मोघली सैनिक मारले जात होते, मुडद्यांचे ढीग पडले होते.

यावेळी ती रायबाघन आपल्या घोड्यावर गप्प बसलेली होती. खानाने आपला घोडा रायबाघनकडे वळविला आणि तो अगतिक शब्दांत तिच्याशी बोलू लागला , ' रायबाघनसाहिबा , अब मैं क्या करूं ? क्या हालत हो गयी अपनी ?'त्यावर रागावलेली रायबाघन खानाला म्हणाली , ' पुण्याहून निघताना आपण मला सल्ला विचारला होतात का ? आपण शिवाजीच्या कोणत्या भागांत नि कसे जाणार आहोत हे ठाऊक होतं का ?'
खानाला आपली चूक कळून चुकली होती. पण आता या बाईच्या शिकवणीचा ऐन कल्लोळात काय उपयोग ? तो म्हणत होता , ' अब मैं क्या करूं ?'

यावर रायबाघनने अगदी स्पष्ट शब्दांत त्याला सुनावलं की , ' हे असलं साहस म्हणजे आत्मघातकी वेडेपणा आहे. मी अजूनही आपल्याला सांगते की , आपण मुकाट्याने शिवाजीराजांकडे ताबडतोब वकील पाठवा. शरण जा. क्षमा मागा त्याची. तो राजा फार मोठ्या उदार मनाचा आहे. अजूनही तो तुम्हाला क्षमा करील. नाही तर सर्वनाश! '

खरंच होतं. खानानं आपला वकील पाठविला. पण त्या प्रचंड गोंधळगदीर्त शिवाजीराजाला गाठण्यासाठी जायचं कसं ? अखेर मोठ्या धडपडीनं तो वकील महाराजांपर्यंत जाऊन पोहोचला , हे मोगलांचं नशीब. त्यानं महाराजांच्या पुढे व्याकूळ होऊन विनवणी केली की , ' आम्ही माहीत नसलेल्या या मुलुखांत आलो. आमचे चुकले. आम्हाला माफ करा. आपल्या तीर्थरुपसाहेबांचा आणि कारतलबसाहेबांचा दोस्ताना फार मोठा आहे. आपण मेहरनजर करावी. आपण रहमदिल आहात. '

महाराजांनी मन मोठं केलं आणि म्हणाले , ' एकाच अटीवर. तुमच्या खानसाहेबांनी जे जे काही बरोबर आणलं आहे ते सर्व जागच्या जागी टाका. आणि रिकाम्या हाताने , निशस्त्र परत जा , कबूल ?' ' जी , कबूल '

खजिना , तंबूडेरे , घोडे , डंकेझेंडे आणि सर्व जखीरा , म्हणजे युद्धसाहित्य जागच्याजागी टाकून खान परत जाण्यास कबूल झाला. त्याला हे भागच होते. त्याची प्रचंड फजिती मावळ्यांनी केली होती.

खान परत निघाला. मान खाली घालून निघाला. त्याचे महत्त्व आणि स्थान कायमचे संपले. तो आयुष्यातून उठला. या उंबरखिंडीच्या युद्धात नेताजी पालकर , तानाजी मालुसरे , पिलाजी सरनाईक इत्यादी उर्मट हत्याऱ्याचे सरदार महाराजांच्या बरोबर होते. सर्वांनी मोगलांच्या विरुद्ध हत्यार चालवून हौस फेडून घेतली.

शाहिस्तेखानाचे हिशोबवहीत आणखी एक जबर पराभव जमा झाला.


लेखक - बाबासाहेब पुरंदरे

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६