शिरगावचा किल्ला




किल्ल्याचा प्रकार : सागर किना-यावरील किल्ले
डोंगररांगः कोकण
जिल्हा : ठाणे
श्रेणी : अत्यंत सोपी

शिरगावचा किल्ला पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला ५ कि.मी. अंतरावर आहे. शिरगावचा किल्ल्यापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो.

इतिहास : १७३९ साली मराठांनी हा किल्ला डहाणू, केळवे, तारापूर या किल्ल्यांबरोबर जिंकून घेतला. मराठांच्या आधी या किल्ल्याचा ताबा पोर्तुगिजांकडे होता. नंतर १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : शिरगावचा किल्ला साधारण २०० फूट लांब व १५० फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे. मात्र किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच व १० फूट रुंद आहे. किल्ल्याला चार कोपर्‍यांत चार बुरूज असून प्रवेशद्वाराजवळही एक बुरूज आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे. हा चबुतरा आपल्यला रायगडावरील महाराजांच्या समाधीची आठवण करून देतो. येथील तटबंदीवर, बुरुजांवर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणार्‍या तटबंदीच्या बाहेरून पायर्‍या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातूनही पायर्‍या केलेल्या आहेत. अर्थात आतून जाणार्‍या पायर्‍या सध्या वापरात नसल्या तरी बुरुजाला असलेल्या खिडक्यांमधून आपल्याला या पायर्‍या दिसतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीत आणखी एक दरवाजा आहे. मात्र आता तो पूर्णपणे बंद केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून पश्चिमेकडे असणार्‍या समुद्रकिनार्‍याचे सुंदर दृश्य दिसते.






गडावर जाण्याच्या वाटा : पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्टेशन म्हणजे विरार. विरारच्या पुढे जाण्यासाठी मेल अथवा शटल पकडावी व पालघरला उतरावे. पालघरला पोहोचल्यावर तेथून सातपाटी मार्गावर धावणार्‍या बस अर्धा-अर्धा तासाने आहेत. या बस
पकडून आपल्याला 'मशीद स्टॉपवर' उतरावे लागते. हे अंतर बसने १५ मिनिटाचे आहे. याशिवाय पालघरहून या स्टॉपवर यायला रिक्षासुद्धा आहेत.मशीद स्टॉपवरून १० मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्यापाशी येतो. किल्ल्याला लागूनच एक शाळा आहे.

राहण्याची सोय : संपूर्ण किल्ला अर्धा-पाऊण तासातच बघून होतो. त्यामुळे राहण्याची गरज नाही. मात्र तशी गरज भासल्यास किल्ल्याला लागूनच असलेल्या शाळेमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : पालघरला अनेक चांगली हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नाही.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६