किल्ले भैरवगड



भैरवगड



किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग
डोंगररांगः ममहाबळेश्र्वर कोयना
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम

भैरवगड हा कोयनानगरच्या विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या सलग
रांगेपासून दुरावलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण. हे अरण्य अभयारण्य
म्हणून धोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर बसवण्यात आली आहेत. त्यामुळे माणसांचा
वावर तसा कमीच. पायथ्याची गावं गाठण्यासाठी एस. टी. ची चांगली सोय आहे.

इतिहास : इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणी साठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : भैरवगडावर पाहण्यासारखे फार काहीच नाही. गडावर एक मंदिर आहे. मंदिर फारच प्रशस्त आहे. मंदिर मजबूत आणि कौलांनी शाकारलेले आहे. मंदिरात भेरी देवी, श्री तुळा देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २-३ फुटी मूर्ती आहेत. या लाकडी मंदिरावर बरेसचे कोरीव काम आढळते. मंदिरासमोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. तसेच समोर दोन तीन खांब देखील दिसतात. समोरच शंकराचे मंदिर सुद्धा आहे. मंदिरासमोरच खाली उतरणार्‍या
वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तीन बुरूज लागतात. येथून थोडे पुढे गेल्यावर एक ढासळलेल्या अवस्थेतील दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. समोर असणार्‍या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस यावे. येथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही टिकते. याच्यापुढे पाहण्यासारखे काहीच नाही. लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे. त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. मंदिराच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे दरीत उतरणार्‍या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे. येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.
गडावर जाण्याच्या वाटा : भैरवगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक थेट कोकणातून वर चढते तर दुसरी हेळवाकच्या रामघळीत पासून गडावर जाते. तिसरी गव्हारे गावातून आहे.
१.
दुर्गवाडी मार्गेः या मार्गेभैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळूण गाठावे. चिपळूण वरून दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण
ते दुर्गवाडी अशी ८ः०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणार्‍या
जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे.
गव्हारे गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही.


२.
हेळवाकची रामघळ मार्गेः हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण - कराड रस्त्यावर कुभांर्ली
घाट पार केल्यावर हेळवाक नावाचा फाटा लागतो. तेथे उतरून २ तासांत रामघळ गाठावी. रामघळीतूनच वर जाणारा रस्ता
पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आपण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास
६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे
असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे.


३.
गव्हारे मार्गेः गडावर जाण्यासाठी गव्हारे गावातूनही वाट आहे. दुर्गवाडी गावाच्या अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा गाडीरस्ता
लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचावे. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून
येणार्‍या वाटेस मिळते.



राहण्याची सोय : गडावरील मंदिरात २० जणांना राहता येते.जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.पाण्याची सोय : बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास - दुर्गवाडी मार्गे. ७ तास - रामघळी मार्गे.सूचना : पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठा प्रमाणात होतो. यापासून बचाव करण्यासाठी मीठ सोबत घेऊन जाणे.
पांडवगड

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांगः महाबळेश्र्वर जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
वाई गावाला खेटूनच उभा असलेला पांडवगड त्याच्या विशिष्ट अशा रचनेमुळे नेहमी लक्ष वेधून घेतो. माथ्यावर कातळ भिंतिचा मुकुट परिधान केलेला हा किल्ला वाईहून सहज पायी जाता येण्यासारखा आहे. वाई मांढरदेव मार्गावर हा गड आहे.
इतिहास : चालुक्यांच्या राज्यांनतर शिलाहारांनी पन्हाळा - कोल्हापूर दख्खन या भागावर राज्य चालविले. १९९१-९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला असे पुरावे आढळतात. हा किल्ला प्रथम आदीलशाहीत होता. ७ ऑक्टोंबर १६७३ मध्ये मराठांनी तो जिंकला. पुढे १७०१ औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहु
महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. इ.स १८१८ मध्ये इगजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : मेणवली गावातून आपण पहिल्या माचीवर गेलो असता तेथून जवळच भैरोबाचे मंदिर लागते.
त्याच्याबाहेरच काही प्राचीन मूर्तीचे अवशेष आहेत. तेथे कातळात कोरलेल्या काही पाय-या आहेत. येथून साधारण १५ ते २०
मिनिटांवर गडाचे प्रवेशद्वार लागते. कातळात कोरलेल्या पाय-यांच्या साह्याने थोडे वर गेल्यावर आपण माची सारख्या भागात प्रवेश
करतो. गडाच्या उत्तरबाजुला काही टाकी आढळतात समोरच पारश्याचा एक बंगला आहे. बंगल्या समोरच कुंपण घातलेले एक टाके
आहे. येथून आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यावर वाटेत काही अवशेष दिसतात, तर एका ठिकाणी सलग सहा पाण्याची
टाकी आढळतात, त्यापैकी एक पाण्याचं टाकं मोठे असून त्याच्या आतील बाजूस खांब देखील आहेत. गावक-यांच्या मते
टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा होता. येथूनच एक पायवाट बालेकिल्ल्याकडे जाते. बालेकिल्ल्याला काहीश्या पाय-या व तटबंदी
शिल्लक आहे. डावीकडे गेल्यावर एका उघडा मंदिरात दगडात कोरलेली मारुतीची मूर्ती दिसते. पुढे काही अंतरावर पांडजाई देवीचे
मोडकळीस आलेले मंदीर आहे. येथून पुढे गेल्यावर एक तळे आहे, आता मात्रा सुकलेल्या अवस्थेत आहे. बालेकिल्ल्याच्या
दक्षिणेस इमारतीचे काही अवशेष दिसतात. या इमारतीचा पाया ३० फुट रुंद असा आहे. तसे पाहिले तर बालेकिल्ला फारच छोटा
आहे. गडाच्या उत्तरेकडे थोडेसे पठार आहे. लोहगडाच्या विंचुकाटा सारखा थोडा भाग पुढे आला आहे. गडाच्या पूर्वेकडून एक
वाट धावडी गावात उतरते. याच गावा जवळ पांडवलेणी आहेत.आपण जेव्हा मेणवली गावाकडून गडावर येतो, तेव्हा जे पहिले
प्रवेशद्वार आहे तेथून गडाचा संपूर्ण घेरा ही खाजगी मालमत्ता आहे. या मागची घटना अशी की पांडवगड कोण्या एका सरदाराची
मालमत्ता होती यानंतर मॅपको कंपनीने तो विकत घेतला. सध्या श्री.सर्वोदय वाडीया नावाचे गृहस्थ केअरटेकर म्हणून राहतात.
त्यांनी गडावर मोठया प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना कुंपण घातले आहे. या गृहस्थाने गडावर एक
फलक देखील लावला आहे, त्याद्वारे गडावर मप्राशन ,धुम्रपान मादक पदार्थ सेवनास बंदी घातली आहे. सर्व गड फिरण्यास दोन
तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा : १) : वाई ते मेणवली सतत गाडांची ये जा चालू असते. मेणवली गावा जवळून धोम धरणाचा जो कालवा गेला आहे तो पार केल्यावर समोरच पांडवगड दिसू लागतो. समोर असणा-या पठारावर गेल्यावर दोन वाटा फुटतात. येथपर्यंत येण्यासाठी गावातून अर्धातास पुरतो. दोन वाटांपैकी एक वाट लांबची आणि वळसा घालून जाणारी आहे. पहिल्या वाटेने पायथ्यावरुन गडावर जाण्यास १ तास पुरतो. या पठारावर कोळी लोकांची वस्ती आहे.
२) : दुसरी वाट गुंडेवाडी गावातून वर जाते. वाई धावडी मार्गेगुंडेवाडी गावातून वर पोहचावे. गुंडेवाडी गावातून चांगली मळलेली आणि काही ठिकाणी अलिकडेच बांधलेल्या पाय-यांची सोपी वाट आहे. यावाटेने गडमाथा गाठण्यास २ तास पुरतात.राहण्याची सोय : १ श्री.सर्वादय वाडीया यांच्या घराबाहेरील शेड मध्ये १० जणांना राहता येते. २.पांडजाई देवीच्या मंदीरात १० ते १५ जणांना राहता येते.जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.पाण्याची सोय : बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : मेणवली मार्गे१ तास, धावडी मार्गे२ तास.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६