स्वराज्यावरचे पहिले संकट


शहाजी महाराजांना पुणे परगण्याची जहागीर मिळाली होती. जीजाबाई साहेब आणि शिवबा राजे पुण्यात राहत आणि त्यांचे आबासाहेब बंगळूरला असत. परक्यांची गुलामी शिवबांच्या मनात खुपत असे. आई जिजाऊ सारखा मार्गदर्शक लाभल्याने महाराजांच्या मनात स्वराज्याचे वारे वाहू लागले होते आणि ह्याचाच प्रत्यय म्हणजे शिवाजीराजांनी कानद खो-यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. तोरणा,लगेच पुढे रोहीडा ... शहाजी पुत्र शिवाजी एक एक पराक्रम गाजवत होता पण त्याकडे कुणाचे फारसे लक्ष नव्हते. लगेचच सुभानमंगळ आणि कोंढाणा राजांनी कब्ज्यात घेतला. आता मात्र आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो ? कुठून आलं हे बळ ? हे मोडलंच पाहिजे.

आणि तो मोडायच्या आत आणखी एक किल्ला स्वराज्यात दाखल झाला आणि तो म्हणजे किल्ले कोंडाणा त्याचे झाले असे :-
कोंडाणा ताब्यात घेण्याची मोहीम राजेंनी पुणे प्रांताचे हवालदार बापूजी मुदगल देशपांडे यांचेवर सोपविली . कोंडण्याचा हवालदार आतून शहाजीराजांच्या पक्षाचा असल्याने बापूजींना सिंहगड मिळविण्यासाठी युद्ध करावे लागले नाही. शके १५६९ राजश्री बापुजीपंतांनी सिव्हगड घेऊन दिले.

कोंडाणा ताब्यात घेणे म्हणजे सरळ सरळ विजापूरकरास खुले आव्हानच करणे. आणि कोंडाणा परत मिळविण्यासाठी ते मोहीम काढणार हे राजेश्री जाणून होतेच आणि ह्या राजकारणात ते गुंतलेही होते.

आता काही हालचाल केली नाही तर हा जास्तच उठाव करेन विचाराने महंमद आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपेल. शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल. अन् मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच. आणि अपेक्षेप्रमाणे या मोहिमेसाठी फतहखान खुदावंतखान याची नेमणूक केली. म्हणजे चिलीमभर जाळ विजवायाला विजापूरकराने रांजणभर पाणीच पाठविले राजेंचे स्वराज्य ते केवढीसे आणि फत्तेखान आपले सैन्य घेऊन पुढे पुढे सरकू लागला.


तिकडे शहाजी राजांना कैद झाली होती. आता मात्र शिवाजी राजे विचारात पडले होते... वाचवायचे तरी काय ? आईचे सौभाग्य की स्वराज्य? दोन्हीही तीर्थरूपच तरीही महाराजांनी स्वराज्यासाठी लढण्याचा निश्चय केला. विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान जेजुरी जवळील बेलसर गावात येऊन ठेपला होता.

बाळाजी हैबतराव याच्या नेतृत्वाखाली काही फौज फतहखानाने शिरवळला तेथील सुभानमंगळचा कोट घेण्यासाठी धाडली. आणि किल्ला जिंकला सुद्धा. मराठ्यांचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. राजांनी आपला मुक्काम तडक राजगडावरून मुठभर सैन्यासमवेत पुरंदरावर हालविला. याचे कारण म्हणजे फतह खान याच्या डोळ्यात होता तो किल्ले कोंडाणा राजे पुरंदरवर आल्याने फतहखानास सरळसरळ कोंडण्यावर हल्ला करता येणार नव्हता.

वास्तविक जेव्हा राजेंनी पुरंदरवर येण्याची मनषा दाखविली तेव्हा गड होता विजापूरकरांकडे
तेव्हा पुरंदरगड इदलशाही येथे नीळकंठराव म्हणोन ब्राम्हण गडास खावंद होते. ते मेले. त्यांचे पुत्र दोघे, ते एकांत भांडू लागले. त्यांची समजावीस करावयास म्हणोन राजे पुरांदरास गेले आणी ते दोघे भाऊ कैद करून गड आपणच घेतला. आपले ठाणे बसविले


खानाची छावणी बेलसरनजीक आली. त्याची फौज म्हणजे नुसता पसाराच राजांचे सैन्य ते किती
महराजांचा एकूण जमाव तीन हजाराहून अधिक होता. गुंजण मावळचे शिळीमकर देशमुख, मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर, कारीचे बाजी कान्होजी जेध, हिरडस मावळचे बाजी बांदल, कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव देशमुख,वेळवंड खोऱ्यातील बाबाजी डोहर देशमुख हे आपल्या जमावानिशी पुरंदरावर उपस्थित होते याशिवाय राजेंभोवती गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, कावजी मल्हार यांसारखे तरुण रक्ताचे खंदे वीर गोळा झाले


आता हालचाल केलीच पाहिजे. या उद्देशाने राजेंनी कट-कारस्थान आखण्यास सुरवात केली.कावजी मल्हार यांचे नेतृत्वाखाली राजांनी काही फौज देऊन शिरवळवर धाडले. आणि शिरवळ काबीज केला देखील बाळाजी हैबतरावास कावजीने भाल्याचा प्रहार करून ठार केले. राजेंची पहिली चाल यशस्वी

आता दुसरी चाल महाराजांनी रात्रीचा फायदा घेऊन फतहखानच्या छावणीवरच एक पथक धाडले. जमेल तेवढे कापून निसटायचेच हा डाव आणि मावळे रात्रीत कापाकापी करत मागे हटले पण झेंड्याच्या पथकावर हल्ला चढवून त्यांना कचाट्यात पकडण्याचे काम खानाच्या लष्कराने केले. ज्याच्या हातात निशान होता त्यास तीर लागला व तो आणि त्याच्या हातातील झेंडा कोसळू लागला सगळ्यांची मने डचमळू लागली पण घुसलाच एक मर्द मराठा त्यात खानाचे सैन्य कापून त्याने तो पडणारा ध्वज सांभाळला त्यांचे नाव बाजी जेधे कान्होजी जेधेंचा हा पुत्र रक्तातील निष्ठेपाई हे करण्यास त्यांस भाग पाडले. आणि ही सर्व मंडळी पुरंदरला निघून गेली

इकडे फत्तेखान माजलेल्या हत्ती प्रमाणे चवताळला होता. त्याचे सैनिक मावळ्यांचा पाठलाग करत पुरंदर पर्यंत आले होते. पुरंदरला वेढा देण्याचे ठरविले होते. फत्तेखान पुरंदरला वेढा देणार ह्याचा विचार महराजांनी आधीच केला होता त्यानुसार महाराजांनी आपले डाव देखील आखले होते .

फत्तेखानने वेढा देण्याचा दिवस निश्चित केला. त्याचे विशाल सैन्य पुरंदरच्या दिशेने सरकू लागले. बघता बघता पुरंदरला मोघली सैन्याचा विळखा बसला. पुरंदरेश्वर मात्र शांतच होता. फत्तेखानास मनोमन जाणवू लागले,
"ये सिवा पहाडी चुहा अपने बिल मे छुप के बैठा है" ''या अल्लाsss...'',

इतक्यात पुढच्या मोर्च्यावर असणारा एक यवन कोसळला. त्याचे तोंड रक्ताने माखलेले. अचानक झालेल्या हल्ल्याने फत्तेखान देखील कावरा बावरा झाला होता. इतक्यात एक , दोन ,तीन... असा एक एक जण पडू लागला. मराठ्यांच्या गोफणी फत्तेखानच्या सैन्याचा खरपूस समाचार घेऊ लागल्या होत्या. खानची सेना या हल्ल्यामुळे भेदरली तर होतीच पण चांगली चोपली गेली होती. अखेर खानच्या सैन्याने माघार घेतली.

दुस-या दिवशी खानची सेना पुन्हा पुरंदरला आली. इकडे महाराजांनी आपल्या मावळ्यांना दगड धोंडे जमविण्यास सांगितले आणि बघता बघता दगडांची रास लागली. पण ह्यावेळेस खानाने घाई केली नाही त्याचे सैन्य आता शहाणे झाले होते. त्यामुळे सापासारखे सरपटत खानाचे सैन्य किल्ल्याच्या दिशेने वर सरकत होते. वरती मराठ्यांना ह्याची कल्पना होतीच आणि स्वागताची तयारीही झालेली. शत्रू टप्प्यात आला. वरतून मोठ्या मोठ्या शिळा खाली येण्यास सुरवात झाली. मराठ्यांनी बरोबर वेळ साधली होती आणि ह्यावेळेस स्वतः खान हत्यारे टाकून पळत सुटला. त्यामुळे आपला जीव मुठीत धरून सगळेच पळू लागले. पण पळताना फत्तेखानाच्या मनात एक विचार जरूर आला असणार, "कैसे है ये मरहट्टे! पथ्थरोंसे खेलते है, नंगे पैर घुमते है... बदन की तो बोटी बोटी दिखती है लेकिन मुक्कदर को बदलने की ताकद रखते है!''

काही मावळ्यांनी गडाखाली येऊन कत्तल चालू केली यात गोदाजी जगताप आघाडीस होते. त्यांनी फतहखानच्या एका मुसेखान नावाच्या खास सरदारास मराठी तलवारीचे पाणी पाजिले.

ह्या लढाईत महाराजांना प्रचंड हत्यारे मिळाली आणि हीच स्वराज्याची पहिली लूट आणि स्वराज्याची हत्यारे!
लढाई जिंकली पण बाजी पासलकरांच्या मृत्यूने सर्वजण दुखी झाले.

Comments

  1. हा गौरवशाली इतिहास आहे. पण आज त्याच मराठ्यांचे वंशज व मराठे असण्याचा आभिमान बाळगणारे त्याचा इतिर्‍हास घडवण्यात पुढाकार घेत आहेत. ते कसे व कोण थांबवणार?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब