मल्हारगड


मल्हारगड



किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः भुलेश्र्वर रांग
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी


महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्र्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते.



इतिहास : या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७५७ ते १७६० च्या कालावधीमध्ये किल्ल्याचे बांधकाम झाले. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा सुद्धा आहे. याच सोनोरी गावात श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती असलेले मंदिर आहे. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे.



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा-पाऊण तास पुरतो. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली असली तरी बर्‍याच ठिकाणी ती शाबूत आहे. पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाडाचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीरही आहे. मात्र ती वापरात नसल्याने गडावरील इतर विहिरीं प्रमाणेच यात पाणी अजिबात नाही. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता असेच तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते.

किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही. असेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणार्‍या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. याही विहिरीत पाण्याची सोय नाही. या बुरुजाच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवी कडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडी गावातून आल्यावर याच दरवाज्यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. आता आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करू. बालेकिल्ल्यातील दोन मंदिरांची शिखरे आपल्याला कधी पासून खुणावत असतात. ही दोन मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंड असून या मंदिरात राहायचे म्हंटल्यावर फारतर ५ - ६ माणसे दाटीवाटीने राहू शकतात. बालेकिल्ल्याचा तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे.

गडावर जाण्याच्या वाटा : मल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने दोन वाटांनी जाता येते.

वाट क्रमांक १ : पुण्याहून सासवडला निघाल्यावर दिवे घाट संपल्यावर काही वेळाने 'झेंडेवाडी' गावाचा फाटा लागतो. येथून २ कि.मी. वर झेंडेवाडी हे गाव आहे. या गावात आपल्याला झेंडूच्या फुलांची शेती केलेली दिसते. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणार्‍या 'ण' आकाराच्या खिंडीत जावे लागते. गावात विचारल्यावर गावकरीही आपल्याला ती खिंड दाखवतात. या खिंडीत पोहोचल्याशिवाय मल्हारगडाचे आपल्याला बिलकुल दर्शन होत नाही. या खिंडीत गेल्यावर समोरच याच डोंगररांगेमध्ये असणारा मल्हारगड आपल्याला दिसतो. तटबंदींनी सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर उतरावा लागत नाही. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धातास तर आपण उतरलेल्या झेंडेवाडीफाटा पासून खिंडपार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे दीड तास लागतो.


वाट क्रमांक २ : सासवड पासून ६ कि.मी. वर 'सोनोरी' हे गाव आहे. या गावाला एस.टी. सासवडहून निघून दिवसातून तीन वेळा म्हणजे स.- १०, दु.- २ आणि संध्या.- ५ या वेळेत भेट देते. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. गडाकडे कूच करण्याआधी सोनोरी गावात असणारा सहा बुरुजांनी युक्त असा पानसे यांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाा गढीप्रमाणे असणार्‍या या वाडात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात मुळीच चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी श्रीकृष्णाची मूर्ती. काळ्या पाषाणात कोरलेली ही अप्रतिम मूर्ती पाहायलाच हवी अशी आहे. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धापाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी टॉवरच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.


राहण्याची सोय : फक्त ५ - ६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र राहाण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते.

जेवणाची सोय : नाही
पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. किल्ल्यात एक तळे व तीन विहिरी आहेत मात्र विहिरींना पाणी अजिबात नाही व तळ्यातील पाणी फक्त वापरण्यासाठी उपयुक्त आहे, पिण्यासाठी नाही.

Comments

Popular posts from this blog

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक