किल्ले सिंदोळा



पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका किल्ले आणि लेणींसाठी समृध्द आहे. पुण्याच्या उत्तरेकडे असणार्‍या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड हडसर, निमगिरी, नारायणग, जिवधन आणि सिंदोळा हे किल्ले आहेत.

सिंदोळा किल्ला जुन्नरच्या वायव्येला आहे. मढनेर म्हणून ओळखल्या जाणार्‍या खोप्यात असलेला सिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे. अहमदनगर-कल्याण हा गाडीमार्ग माळशेज घाटामधून जातो. या गाडीमार्गावर मढ गावाच्या पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर खुबी फाटा आहे. या खुबी फाट्यावर जुन्नर कडूनही येता येते. खुबी फाट्यावर उतरुन येथून उत्तरेकडील हरिश्चंद्रगडाकडे जाणारी वाट आहे.

खुबी फाट्याच्या नैऋत्येला सिंदोळा किल्ला उढावलेला दिसतो. सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून पुर्वेकडे एक डोंगर धार गेलेली आहे. या डोंगर धारे मधे एक खिंड दिसते. या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे. अर्ध्या पाऊण तासात आपण या खिंडीमधे पोहोचतो. खिंडीतून पुढे न जाता डावीकडे डोंगरदांडावर चढणारी वाट पकडून डोंगर दांडावर यावे लागते. या दांडावर आल्यावर डावीकडे खोप्याच्या पलिकडे निमगिरीचा किल्ला दिसतो. समोर सिंदोळ्यामागे उधळ्या पर्वत दिसतो तर उत्तरेकडे टोलारखिंड आणि हरिश्चंद्रगड पसरलेला दिसतो. समोरच्या सिंदोळ्या दिशेने चढाई केल्यावर आपण माथ्याच्या खाली येवून पोहोचतो. आता माथ्याच्या वरुन आलेली मोठी घळही दिसते. ही घळ उजवीकडे ठेवून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण सिंदोळ्याच्या पश्चिम अंगाला येतो. पश्चिमेकडील घळीमधूनच गडावर जाणारा मार्ग आहे. वाटेमधे तुटलेल्या पायर्‍या लागतात. या पायर्‍यांच्या मार्गाने चढताना उधळ्या डोंगर आपल्या पाठीमागे रहातो. दरवाजाचे नाममात्र अवशेष आणि तटबंदीचे थोडेसे अवशेष आपल्याला दिसतात.

गडाच्या माथ्यावर पाण्याची काही टाकी आहेत. पाणी बारामहीने टिकत नाही. एक उघड्यावरचे मंदिर आहे. एका खडकातील खड्यामधे अनेक त्रिशुळ उभे केलेले दिसतात. गडाच्या माथ्यावरुन हडसर, चावंड, शिवनेरी तसेच माळशेज घाटाखालील प्रदेश न्याहाळता येतो. गडफेरी करण्यास अर्धातास पुरतो. पुन्हा आल्यावाटेने खाली उतरावे लागते. कड्यात कोरलेल्या गणेशाला नमन करुन आपण परतीच्या वाटेवर निघतो. सिंदोळा किल्ल्याचा परिसर निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. मात्र हे सौंदर्य पावसाळ्यानंतर शतपटीने वाढते. सिंदोळ्याची भ्रमंती म्हणजे एक दुर्लक्षीत किल्ला पाहिल्याचे समाधान देवून जाते हे निश्चित.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६