किल्ले पेठपेठकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः भीमाशंकर
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम

कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ कि.मी. अंतरावर आहे. राजमाची आणि ढाक किल्ल्यांच्या आणि सिध्दगड भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा उभारून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या किल्ल्याला पायथ्याच्या 'पेठ' या गावामुळे 'पेठचा किल्ला' असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याचा उल्लेख कोथळा असाही आढळतो. लहानशा दिसणार्‍या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ दुर्ग नाही पण बेलाग सुळक्यावरचा एक संरक्षक ठाणं होता. मराठांचे या किल्ल्यावर
शस्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले.

इतिहास : औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलिबिरादरकानी यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. 'कोथळागड' हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची ने-आण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच
गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठांनी त्यांना मागे हटवले पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्यांनी 'दरवाजा उघडा' अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत.म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले. मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले. झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.
दुसर्‍याच दिवशी मराठांनी किल्ल्याला वेढा घातला. फार मोठी लढाई झाली. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. बाणांची व बंदुकीची लढाई झाली. किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने
आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठांचा सरदार नारोजी त्रिंबक यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली. नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले. किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला 'मिफ्ताहुलफतह' (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला. गड परत मिळवण्यासाठी मराठांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मर्‍हामतखानालाही ७००० मराठांच्या तुकडीने अडवले. पण मराठांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला.


२०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले पण मराठांची फत्ते होऊ शकली नाही. मराठांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पायवाटेने वर पोहोचल्यावर समोरच कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत. गडमाथ्यावरील मंद वारा, तेथील जलाशय आणि आजुबाजूची वनराई सुखावह आहे. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो.

गडावर जाण्याच्या वाटा : कर्जतहून एस्‌.टी. ने कशेळे मार्गेआंबिवली या गावात जावे. हे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस्‌.टी. पकडून आंबिवली गावात यावे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाच्या पायथ्याशी 'पेठ' हे गाव आहे. या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदांची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते.

राहण्याची सोय : भैरोबाच्या गुहेत २०-२५ जण व्यवस्थित राहू शकतात.
जेवणाची सोय : आपणच करावी. पेठ गावात 'कोथळागड' नावाचे हॉटेल आहे.
पाण्याची सोय : गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : आंबिवली गावापासून : २ तास , पेठ गावापासून : १ तास

No comments:

Post a Comment