संग्रामदुर्गाचा संग्राम


अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन रुस्तुम-ए-जमा याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्या सोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा फाझलखान. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला.

आता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने सिद्दी जोहरला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले. (ह्यावरून कल्पना करा की ज्या शक्तींच्या विरुद्ध राजे स्वराज्य उभे करत होते त्या किती बलाढ्य होत्या) सिद्दीने पन्हाळ्याला वेढा घातला आणि मराठ्यांच्या हालचाली थांबल्या. वेढा उठवण्यासाठी नेतोजी पालकर बेळगाव, अथणी आणि खुद्द विजापूरपर्यंत धडका मारत होता... वेढा उठवायची शर्थ करत होता. पण त्याला यश येत नव्हते.

अशात ६ महिने होऊन गेले. पावसाळा उजाडला तरी शिवराय पन्हाळ्यावर वेढ्यामध्ये बंदिस्त होते. तिकडे उत्तर सीमेवर मुघल फौजेने स्वराज्यावर हल्ला चढवला होता. औरंगाबाद वरून निघालेल्या शाही फौजा शास्ताखानाच्या नेतृत्वाखाली थेट पुण्याला पोचल्या होत्या. शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर. हा किल्ला सहज आपल्या हातात पडेल असा त्याचा भ्रम असावा. पण ती विसरला असावा की उंचावर असलेला १ सैनिक खालच्या १० सैनिकांच्या बरोबर असतो. शिवाय किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. एक खरे-खुरे लढवय्ये मराठा. पावसाळ्याची सुरवात होणार होती म्हणून किल्ल्यात दाणा-गोटा पुरेपूर भरला होता. किल्ल्यात ३००-३५० फौज होती. वेढा पडला तरी किल्ला सहज सहजी हाती पडायची सुतराम शक्यता नव्हती.

मुघलांनी वेढा घालून मोर्चे बांधले आणि तोफांचा भडीमार करू लागले. मुघल सैनिक किल्ल्याच्या तटा-बुरुजाशी लगट करू लागले की त्यांच्यावर गोफणगुंडे बसायचे. एक अत्यंत साधे पण सर्वात लांब जाणारे प्रभावी असे अस्त्र होते ते आणि अर्थात मराठे त्यात पूर्णपणे निष्णात होते. फिरंगोजी नरसाळा यांनी अवघ्या ३००-३५०च्या फौजेनिशी किल्ला तब्बल ५५ दिवस लढवला. अखेर मुघलांनी तटापर्यंत पोहोचायला भुयार खोदायला सुरवात केली. त्यांना किल्ल्यातून प्रचंड प्रतिकार होत होता. अखेर मुघलांना १४ ऑगस्ट १६६० रोजी अश आले. भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले. किल्ल्याची एक बाजू उघडी पडली. हातघाईची प्रचंड लढाई झाली. आपल्या सैनिकांची वाताहत होणार हे लक्ष्यात येताच त्यांना महाराजांचे शब्द नक्कीच आठवले असतील.

राजे म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी'

शेवटी फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले. महाराज तोपर्यंत वेढ्यातून सुटून राजगडी पोचले होते. किल्ला हातचा गेला म्हणून महाराजांची भेट त्यांनी खिन मनानेच घेतली असेल. पण आपल्या प्रत्येक माणसाची राजांना अचूक ओळख होती. ते फिरंगोजीना म्हणाले असतील,'फिरंगोजी. केवढा पराक्रम केला. असे हताश का?'

किल्ला हातातून गेला तरी फिरंगोजीच्या पराक्रमावर खुश होउन शिवाजीराजांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला एक मानाची तलवार भेट दिली. फिरंगोजी ताठ मानेने आणि नव्या उत्साहाने आपल्या नव्या मोहिमेवर निघाले...

लेखक - रोहन चौधरी

6 comments:

 1. छान आहे मित्रा............

  ReplyDelete
 2. santosh chavhan02:03

  मस्त रे मित्रा तुझ्यामुळे फार उपयुक्त माहिती मिळते मला धन्यवाद

  ReplyDelete
 3. छान आहे मित्रा..........

  ReplyDelete
 4. Anonymous06:33

  khare tar he vrat prattyek matarhyane ghyayla have ahe. tyat tu pudhakar ghetlays, basssss mitra shabd nahit tuze abhar manayla....!

  ReplyDelete
 5. khare tar he vrat prattyek matarhyane ghyayla have ahe. tyat tu pudhakar ghetlays, basssss mitra shabd nahit tuze abhar manayla....!

  ReplyDelete
 6. hey dude its very nice I am also great fan of Shivba Raje tyanchya baddal khup aadar aani abhimaan aahe apna sarvana nai ka
  nice info u provides....

  ReplyDelete