शिवप्रताप दिवस

"मासाहेब, उद्या आम्ही खान भेटीला जाऊ. जगदंबा आमच्या पाठीशी आहेच पण काही बरं वाईट झाले तर आपले राज्य ..."
"शिवबा...........
"तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या चिंतेने तुमचा धीर खचून जाता काम नये "

जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात.

महाराजांनी जावळी मारली आणि विजापूरची आदिलशाही पार थरारून गेली. सह्याद्रीचा हा वाघ आता डोईजड झाला होता. ह्याचा बंदोबस्त करणे म्हणजे काळाची गरज झाली होती. म्हणून बड्या बेगमने भर दरबारात आवाहन केले - ''कोण? कोण? कोण जाईल सह्याद्रीच्या त्या गुहेत? कोण पकडेल त्या वाघाला?'' सगळ्यांची जुबान बंद, डोळे जमिनीचे वेध घेत, मुंड्या खाली झुकल्या होत्या. बडी बेगम आग ओकत होती, " ऐसा कोई मायका लाल नही, ऐसा एक भी मर्द नही इस बिजापुर दरबार में?" उत्तर काही येत नव्हते. पानाचे विडे जसे होते तसे तबकात निपचित पडले होते.

"हम जायेंगे बेगम साहिबा" कोण? कोण? कोण? सगळ्यांच्या माना मागे वळत होत्या. नक्की आवाज आला कुणाचा?

तो तोच ज्याने फर्जंद शहाजी राजांना कैद केले.
तो तोच ज्याने संभाजी राजांना दगा करून मारले.
तो तोच ज्याची औरंगजेबला पकडण्यापर्यंत मजल गेली.
आडवा तिडवा धिप्पाड अंगाचा, प्रचंड बुरुजासारखा, जसा राक्षसी देहाचा तसाच राक्षसी मनाचा.
... अफजल खान

उचलला विडा, आणि कोसळला महाराष्ट्रावर.

रक्ताचा सडा शिंपून उभे केलेले शिवार हा भस्मासूर पायदळी तुडवत निघाला, देव फोडले, मंदिरे नासवली, बाटवली. आता शिवाजी बाहेर पडेल असा त्याचा डाव. पण राजे लवकर बाहेर येईनात. इकडे खानने रयत मारावयास सुरवात केली.

महाराजांनी राजगड सोडला व प्रतापगड जवळ केला. तो मृत्यूला घाबरून म्हणून नाही, तर राजगड ते प्रतापगड हा स्वराज्याचा बहुतांश भाग राजांनी अफझलखानपासून वाचवला. त्यात तो परिसर अतिभयाण. प्रतापगडाला जाण्यासाठी त्यावेळी एकच वाट होती. ती म्हणजे रणतोंडीची वाट. ज्या वाटेवरून जाताना तोंड रडल्याखेरीज राहत नाही अशी ती वाट.

खानाने घाईने वाई जवळ केली. खानाचे चाळीस हजाराचे सैन्य वाईच्या पसरणी घाटात पसरले. खानने राजांना खलिता पाठविला. ''जान प्यारी असेल तर तुरंत शरण ये. नाहीतर बेमोत मारला जाशील.'' सक्त दमाची भाषा. महाराजांनी खलित्यास उत्तर पाठविले, अतिशय रसाळ भाषेत, ''तुम्ही तर आमच्या वडिलांच्या ठायी! आम्हाला तुमची फार भीती वाटते. तुम्हीच आम्हाला भेटायला या, म्हणजे आम्हाला जरा धीर येईल. राज्य आपलेच आहे.''

घोळून घोळून खानला आणला प्रतापगडावर. उभारला खानासाठी शामियाना. असा शामियाना की नक्षीदार, जडजवाहीर जडित, संपत्तीची लयलूट केलेला. इतका देखणा की बघावं आणि बघतच रहावं. असा शामियाना उभारायचं कारण म्हणजे खानाला संपत्तीची अशी लयलूट आवडते. ही सगळी संपत्ती बघून खान भुलतो.

घरात पाहुणे येणार असतील तर पाहुण्यांच्या आधी हजर आपण. पण इथे उलटे आधी खान आला. शामियान्यात का... तर खान शामियान्यात आला आणि त्याला शिवाजी पहिला दिसला तर त्याच्या डोक्यात राग राहणारच. त्यामुळे आधी खान शामियान्यात आला आणि हरवून गेला. भुलून गेला खान त्या शामियान्याची शोभा बघून. मानसशास्त्र आहे हे महाराजांचे. खान येऊन टेकला आणि मग महाराजांनी गड सोडला. खानाचा शामियाना महाराजांना व्यवस्थित दिसत होता. पण महाराज वरतून येताना मात्र खानाला दिसू नये, म्हणून गड सोडण्याची वेळ सुद्धा भर दुपारची. आले महाराज. सोबत दहा अंगरक्षक.

शामियान्याच्या अलीकडे येवून राजे थांबले. आपल्या वकीलास शामियान्यात पाठविले व सय्यद बंडास बाहेर जाण्यास सांगितले. कारण सांगितले की, ''शिवाजी राजे डरते है सय्यद बंडा से'' खानाचे मानसिक खच्चीकरण राजांनी केले (आता शिवाजी तर आपल्या नोकरालाच घाबरतो मग आपणास तर...) चढला खान हरभ-याच्या झाडावर. जगाने या डावाला गनिमी कावा मानला, पण आपण ह्यास शिवसूत्र मानले.

राजे शामियान्यात आले बातचीत झाली आणि गळाभेटीसाठी राजे आणि खान पुढे सरसावले. जकडले राजांना आपल्या बाहुत. झाला दगा. मारला खानने खंजीर राजांच्या पाठीत, सदरा फाटला. चिलखत असल्यामुळे राजांना इजा झाली नाही. पुढे राजांनी चाल केली. घातला बिचवा पोटात आणि पापणी लवायच्या आत काढला खानचा कोथळा बाहेर. खान कलंडला. सय्यद बंडा राजांवर चाल करून आला पण जीवा महालेने त्याचा अचूक वेध घेतला.

खान स्वतःला सावरत शामियान्याच्या बाहेर जाऊन त्याच्या पालखीत पडला. खानाच्या भोयांनी पालखी उचलून पळण्याची लगबग सुरु केली पण... खानाला तोडीस तोड अशा धिप्पाड अंगाचा, एकाच वेळी अर्ध बकरं जागीच बसवणारा, चार पाय धरून घोडा उचलणारा, चिखलात रुतलेली तोफ एकटाच काढणारा, असा संभाजी कावजी समोर ठाकला. ओढले त्याने वार भोयाच्या पायावर, पालखी पडली. पुढचा वार झाला तो खानच्या मानेवर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या संकटास गर्दीस मिळवले.
(नितीन बानुगडे पाटील)खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाची तलवार धरून जवळच उभा होता तो शिवरायांवर वार करता झाला. वार राजेंच्या डोक्याला चाटून गेला. महाराज थोडक्यात बचावले. आणि महाराजांनी एकाच वारात त्यालाही गर्दीस मिळविले.
माझ्या माहितीनुसार ही राजेंच्या आयुष्यतील त्यांच्यावर झालेली एकवेम जखम

ह्या भेटीच्या वेळी महाराजांसोबत असणारे दहा अंगरक्षक

१. संभाजी कावजी २. काताजी इंगळे ३. कोंडाजी कंक ४. येसाजी कंक ५. कृष्णाजी गायकवाड ६. सुरजी काटके ७. जीवा महाला ८. विसाजी मुरंबक ९. संभाजी करवर १०. इब्राहीम सिद्दी

या लढाईत झालेले नुकसान

मराठ्यांचे ह्या लढाईत थोडेफार नुकसान झालेच. महाराजांचे एकूण १७३४ लोक या झुंजीत मारले गेले. तर ४२७ जखमी झाले. या खेरीज बाबाजी भोसले. व शामराज पद्मनाभी हे सरदार मारले गेले.

खानच्या फौजेचे नुकसान

मराठ्यांच्या तुलनेने खानाचे अधिक नुकसान झाले होते. खानाचे अगणित सरदार व सैन्य हे तर सोडाच त्याचे सुमारे ६५ हत्ती व हत्तीणी, ४००० घोडे, १२०० उंट, ३ लक्षांचे जडजवाहीर, २ हजार कापडाची ठाणे, ७ लक्ष नगद मोहरा व सोन्याचे होन याशिवाय तोफा वैगरे बरीच मालमत्ता महाराजांच्या हाती पडली.

एका प्रचंड मोहिमेचा असा शेवट होऊन श्रीनृपशालिवाहन शके १५८१ विकारी नाम संवत्सरी, मार्गशीष शुद्ध सप्तमीस, गुरवारी ८ वे तासी (दि. १० नोव्हें. १६५९ रोजी दुपारी २ वाजता) देवांचा द्वेष्टा अफझलखान महाराजांनी ठार मारला

Source
शिवभारत
शककर्ते शिवराय
नितीन बानगुडे पाटील - व्याख्यान


14 comments:

 1. wowwwwwwwww jai bhawani jai shivaji

  ReplyDelete
 2. pradnya23:19

  khup sundar blog aavadala. Dharmabhimanat bhar padali.

  ReplyDelete
 3. खुपच छान... अप्रतिम लेख अगदी महाराज डोळ्यासमोर उभे जाले

  ReplyDelete
 4. जय भवानी जय शिवाजी

  ReplyDelete
 5. आतंकवाद असाच संपवावा लागतो....................ज्याचे जैसे असेल त्यास तैसे भरावे लागेल............

  ReplyDelete
 6. छत्रपतिनि अशा तर्हेने पावन केला कृष्णेचा घाट .....................अणि मराठेशाहिचा मांडला थाट

  ReplyDelete
 7. Anonymous06:37

  जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात.

  ReplyDelete
 8. apratim shabd bandhani aani vyavasthit prandache vishleshan. Asech prabodhan chalu thev mitra, karan shivcharitrapasun ajun barech maharashtriyan wanchit ahet. Ha itihaas sarvan paryant pohochayla hawaach. Baki amhi navnavin mitranna tuzya blogchi olakh karun detoych (Hee matr aamchi jababdari, jababdari kasali? kartavyach te...!)

  ReplyDelete
 9. संतोष आपणासारखे मित्र असता हे कार्य नक्की होणारच ह्यात मला तिळमात्र शंका नाही.
  आणि आई भवानीच्या आशीर्वादाने हे काम असेच चालू राहिल ह्याबाबत विश्वास बाळगावा

  ReplyDelete
 10. KHUPACH SUNDAR SANGRAHNIY ASA LEKH AAHE.DHANYAWAD

  ReplyDelete
 11. खुपच छान...................!

  ReplyDelete
 12. Anonymous02:23

  तुमचे सर्वच लेख जबरदस्त आहे एकदम भारी

  ReplyDelete
 13. Jay Bhavani Jay Shivrai

  ReplyDelete
 14. Sir tumhi KRUSHNAJI BHASKAR HYACHA SIR NAME JAR POST MADDHE TAKLE ASTE TAR BARE ZALE ASTE....KURSHNAJI BHASKAR KULKARNI TYACHA PURNA NAAV.

  ReplyDelete