जिजाऊसाहेबांची सुवर्णतुला


शहाजी राजांच्या मृत्यूमुळे महाराजांचे तसेच जिजाऊसाहेबांचे भावजीवनही डहूळलेले होते. त्यातच धूमकेतूचे दर्शन व पाठोपाठ सूर्यग्रहण आले. अशावेळी मोहीम तात्पुरती स्थगित ठेवून महाराज प्रतापगडी परतले. सूर्यग्रहणाच्या पर्वावर यावेळी जिजाऊसाहेबांची तुला करण्याचे महाराजांनी ठरविले. या तुळाविधीसाठी महाराज आपल्या सर्व कुटुंबियांसोबत श्रीमहाबळेश्वर क्षेत्री आले. सोनोपंत डबीरही यावेळी यांच्यासोबत होते. सोनोपंत आता अतिशय वृद्ध झालेले होते.

महाबळेश्वरला महराजांचा पहिला मुक्काम तुलेच्या निमित्ताने किमान २-३ दिवस तरी झाला. या मुक्कामाकडे महाबळेश्वरचा परिसर गजबजून गेला. तुलावेदी बांधली गेली. मंडपरचना झाली. तुला-तोरणाची उभारणी झाली(तुलेकरिता उभारावयाचे तोरण लाकडी असावे लागते.)

तुलादानाच्या पूर्वदिवशी करावयाचा विधी गुरुवार दिनांक ५ जानेवारी १६६५ रोजी पार पडल. वेदीच्या भोवती कुंड सिद्धी व देवता स्थापना करण्यात आली. ब्राम्हण, गुरु, पुरोहित यांच्या वेदमंत्रोच्चारांनी परिसर दुमदुमून गेला. हेमकुंड पेटले. दशदिक्पालांनाआवाहन केले गेले आणि श्रीन्रूपशालिवाहन शके १५८६, क्रोधी नाम संवत्सराची पौष वद्य अमावस्या उजाडली. या दिवशी शुक्रवार होता. व इंग्रजी तारीख होती. जानेवारी १६६५. सूर्यास ग्रहण लागले. महाबळेश्वरच्या मंदिरासमोर तुला-मंडप उभारलेला होता. जवळच कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री या पंचनद्यांच्या गोमुखातून संतत जलधार वाहत होती.

ग्रहणाचा मोक्षकाल सुरु झाला. आणि या पुण्यपर्वावर आऊसाहेबांची तुला केली गेली. आऊसाहेबांच्या भारंभार तोलले गेलेले सोने, रूपे, दान करण्यात आले. महाराजांच्या भावजीवनातील एक सुखद सोहळा पार पडला. आऊसाहेबांची सुवर्णतुला झाल्यावार सोनोपंत डबीर यांची देखील सुवर्णतुला महाराजांनी केली. तुलाविधीनंतर एकोणीस दिवसातच म्हणजे २५ जानेवारी १६६५ ला सोनोपंत परलोकात गेले.

No comments:

Post a Comment