संताजी नावाचे वादळ

हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसावापट्टणच्या गढीतून बाहेर पडला आणि त्याने संताजींवर चाल केली.

संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसावापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः संताजी नेतृत्व करून लढत होते. लढाई घनघोर सुरु झाली. खान शौर्याने लढत होता. उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजींनी माघार घेतली. रण टाकून संताजी पाठमोरे पळायला लागले.

हिंमतखानला काही सुचेना त्याला त्याचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हाच तो संताजी ज्याने बादशहाच्या शामियान्यावरील सोन्याचे कळस मारिले. हाच तो संताजी ज्याने दस्तूरखुद्द संभाजी राजेंना कैद करणाऱ्या त्या मुक्करबखानास जायबंदी केलं. हाच तो संताजी ज्याचा भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे तामिळनाडू ढवळून निघाले, हाच तो संताजी ज्याचा मर्दुमकीमुळे मोगलांची दोड्डेरीकडे लांच्छनास्पद माघार घ्यावी लागली तो संताजी आज रणांगण सोडून पळतोय

हिंमतखानाने तडक संताजींचा पाठलाग सुरु केला. मोठ्या जोमाने तो संताजींचा पाठलाग करू लागला कारण वाघाला मैदान सोडून पळताना पाहिलंचं होतं कुणी तेव्हा? पाठलाग करत संताजी आले त्या जंगलात जिथे त्यांची पहिली तुकडी दबा धरून बसली होती. खान व त्यांचे सैन्य आपल्या कह्यात आल्याबरोबर. संताजी एकाएकी थांबला व पलटी खाऊन त्यांनी लढाईस सुरवात केली. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्याने खानास त्याच्या सैन्यासह, घेरले. संताजींचे अनेक बंदूकधारी जंगलातील झाडावर दबा धरून बसलेले. आणि नेमबाजीमध्ये ते चांगलेच तरबेज होते. कचाट्यात सापडलेल्या हिंमतखानच्या सैन्याची चांगलीच लांडगेतोड मराठ्यांनी केली.

सर्व बाजूंनी वेढला जाऊनही खान पराक्रमाने लढला. ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली. व तो जबर जखमी होऊन हौद्यात कोसळला. आता मोगल सेनेचे नीतिधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडव झाला. या लढाईत मोगलांचे एकूण ५०० सैनिक ठार झाले. काही मोगल सैनिकांनी जखमी हिंमतखान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले. तेथे तो त्याचं दिवशी मरण पावला खुद्द संताजींना ह्या लढाईत बाणाच्या दोन जखमा झाल्याचा उल्लेख आहे.

ही लढाई झाली २० जानेवारी १६९६

शिवाजी महाराजांनी शिकवलेला गनिमी कावा संताजींनी पुरेपुर लक्षात ठेवाला. त्याचा वापर केला. आणि राज्याभिषेकानंतर अभिषेकासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी बहादूर खानच्या पेडगावच्या छावणीवर हल्ला करून जसा कावा साधला होता अगदी तसाच डाव इथे संताजींनी साधला.

2 comments:

  1. Anonymous19:08

    पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा
    जय शिवराय

    ReplyDelete
  2. महान होते राजे ! महान होते त्यांचे मावळे !!....संताजी घोरपडेना आमचा मानाचा मुजरा. !! जय शिवराय !! !! जय मावळा !!

    ReplyDelete