फोंडा काबीज


सन १६७५ कुडाळवरून महाराज फोंड्यावर चालून गेले. रुस्तुमेजमानचा पुत्र महमदखान हा फोंड्यावरून अटीतटीने झुंजू लागला. युद्धाच्या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंची बरीच प्राणहानी होऊ लागली. महाराजांनी चार वेळा फोंड्याला सुरुंग लावले. पण महमदखानने तेवढेच सुरुंग लावून त्यांना प्रत्युत्तर दिले. अखेर महाराजांनी तटापासून बारा फुटांवर सैनिकांसाठी संरक्षक भिंत बांधली व फोंडा घेण्याचा निर्धार करून दि. ८ एप्रिल रोजी २००० घोडदळ व ७००० पायदळानिशी फोंड्याला वेढा दिला.

पावसात देखील वेढा सुरु ठेवण्याचे महाराजांनी ठरविले. राजेश्री स्वतः फोंड्यालाच तळ ठोकून बसले होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या करून त्यांना आदिलशाही हद्दीतील एटगेरी व गोवळकोंड्याच्या हद्दीतील दोन शहरांकडे लुट करण्यासाठी रवाना केले. मराठ्यांनी सर्व ठिकाणी प्रचंड लुट करून ती सर्व संपत्ती व काही कैद केलेले सावकार फोंड्याला महाराजांजवळ आणले. पोर्तुगीज गुप्तपणे महमदखानला मदत करत होते. त्यांची कुकली व वरुडे हि गावेही मराठ्यांनी लुटली. महमद खानाजवळ फक्त चार महिने पुरेल एवढीच रसद होती. त्याच्या कुमकेस रुस्तमेजमान १५०० घोडदळ व काही पायदळ घेऊन आला. महमदखान नेटाने तोंड देत होता.

महाराजही चिवटपणे वेढा घालून बसले होते. मराठे तटाला भिडण्याचा प्रयत्न करत होते. पण वरून सतत मारा चालू असल्याने मात्रा चालेना. तेव्हा महाराजांनी ५०० शिड्या तयार केल्या. त्यांच्या सहाय्याने ताटवर चढून जाण्याचे धाडस करणाऱ्याला अर्धा शेर वजनाचा तोडा बक्षीस देण्याचे घोषित केले. व असे ५०० तोडे बनविले. मराठ्यांची जिद्द हळूहळू वाढू लागली . पण तेवढ्यातच ८००० घोडदळ व ७००० पायदळासह बहलोलखान चालून येत असल्याची बातमी फोंड्याला येऊन थडकली. त्याला रोखण्यासाठी महाराज तातडीने निघाले. बहलोल मिरजेला होता. त्याने फोंड्याची कुमक करण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी झाडे तोडून त्याच्या वाटा बंद केल्या व सर्वत्र पहारे ठेवून त्याची नाकेबंदी केली.

(कारवारकर इंग्रजांच्या माहितीनुसार मात्र, माहराजांनी मात्र खानाला ५० होनांची लाच दिली तसेच त्याच्या प्रांताला तसवीस न लावण्याचे वचन दिल्यावरून खानाने महाराजांना विरोध केला नाही.)

बहलोलखानाचा बंदोबस्त करून महाराज त्वरेने फोंड्याला परतले. त्यांच्या उत्तेजानावरून मराठे जिद्दीने तटावर चढून गेले. व फोंड्यावरून होणारा मारा बंद पडला असावा असे वाटते. लगेच सुरुंग लावून मराठ्यांनी फोंडा कोट उडवला. शके १५९७, राक्षस नाम संवत्सरे, वैशाख शु. २ला म्हणजे दि. १७ एप्रिल १६७५ रोजी फोंडा महाराजांनी जिंकला. महमदखान व त्याचे साथीदार कैद झाले. आसपासचे सर्वच आदिलशाही किल्ले मराठ्यांच्या ताब्यात द्यावे असे महाराजांनी त्याच्याकडून लिहून घेतले व मोबदल्यात त्याला जीवदान मिळाले. अन फोंड्याची मुखत्यारी धर्माजी नागनाथला दिली गेली.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब