जुन्नरवरील आकस्मित छापा. ३० एप्रिल १६५७

स्वराज्यविस्तार जोमाने चालूच होता. माणसाने माणूस जोडण्याचे काम जोमाने सुरु होते. इकडे अंतर्गत लाथाळ्या व शाहजादा औरंगजेबासारख्या धूर्त व महत्वकांक्षी मोगल युवराजकडून झालेले आक्रमण यामुळे आदिलशाहीची स्थिती अतिशय केविलवाणी झाली. अन् औरंगजेबाने प्रत्यक्ष विजापूर गिळंकृत करावयाचे ठरविले होते.

आदिलशाहीची आगतिकता व औरंगजेबाची महत्वकांक्षी वृत्ती या दोहोंचा स्वराज्य संवर्धनासाठी फायदा करून घेण्यासाठी महाराजांनी जी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखविली ती खरोखरी थक्क करून सोडणारी. महाराजांनी प्रथम नगरचा मोगली अधिकारी मुल्तफखान याला पत्र लिहिले की, आपली मागणी मंजूर होत असेल तर आपण शाही फौजेत शामिल व्हायला तयार आहोत, खानकडून राजेंना अनुकूल उत्तर प्राप्त झाले. या बळावर महाराजांनी औरंगजेबाकडे आपले वकील म्हणून सोनोपंत यांना रवाना केले. सोनोपंतांनी महाराजांची मागणी औरंगजेबासमोर ठेवली महाराजांचे म्हणणे असे होते की, विजापूरकरांचा जो मुलुख व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेबाने मान्यता द्यावी.

औरंगजेबाने महाराजांची मागणी मंजूर केली व तसें मान्यतादर्शक पत्रही २३ एप्रिल १६५७ रोजी पाठविले. त्यात तो लिहितो, ...सांप्रत जे किल्ले व मुलुख (विजापूरकरांकडील)तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याखालील मुलखाचा महसूल तुम्हास दिला असे.

वास्तविक यात औरंगजेबाच्या बापाचे काहीच जात नव्हते कारण मुलुख विजापूरकरांचा अन राजेंनी अधिपात्यासाठी परवानगी मागितली ती बादशहा होण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या औरंगजेबाची. निव्वळ मान्यतादर्शक शब्दांचा खेळ खेळायचा होता औरंगजेबाला हे त्याने आनंदाने केले! औरंगजेबाच्या मान्यतादर्शक पत्राचे मोल महाराज ही जाणत होते! आपल्या मनाचा थांगपत्ताही न लागू देता त्यांनी औरंगजेबाला चुचकारले., मोठेपणा देऊन त्याला बेसावध ठेवले व फक्त सातच दिवसांनी म्हणजे ३० एप्रिल १६५७ रोजी अकस्मात जुन्नारवर हल्ला चढविला. जुन्नरचे ठाणे मोघलांच्या म्हणजे औरंगजेबाच्या राज्यातील होते! नुकतीच महाराज, औरंगजेब मैत्री झालेली असल्याने जुन्नरचा किल्लेदार बेसावध होता. जुन्नरला परकोट होता. बाकी संरक्षण व्यवस्था जेमतेमच होती.

वैशाख वद्य द्वादाशीची रात्र. काळोखातच महाराज जुन्नरला पोहोचले. दोराच्या शिड्या लावून मावळे परकोटातून आत शिरले. पहारेकऱ्यांना मारून त्यांनी अचानक जुन्नरचे ठाणे लुटायला सुरवात केली. जुन्नरला मोगली सैन्य फारच कमी असल्याने राजांना जास्त प्रतिकार झालाच नाही. जुन्नर पार लुटले गेले. या लुटीत महाराजांना २०० घोडे, ३ लक्ष नगदी होन, शिवाय कापड, जिन्नस व जडजवाहीर वैगरे भरपूर माल मिळाला.

1 comment: