राजांची सुवर्णतुला २९ मे १६७४

राजांच्या तुलादान विधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूचा पाय पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीरबैठक घेतली. गागाभट्ट, बाळभट्ट, अनंतभट्ट ओंजळी-ओंजळींनी तबकातील झळझळीत सुवर्णमुद्रा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले. भोसालाई सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले.

रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. "य उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी सोडून उठू नये! " असे त्यांना वाटत होते.

राजांनी विरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले.

राजांची सुवर्णतुला झाली. मंत्राचा घोषच घोष उठला. सतरा हजार तोलाल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टानी मंत्रित फुले ठेवली. चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आखणी पंधरा तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या

थोरल्या राजांची तुला झाली आता वेळ होती ती धाकल्या धन्याची. गागाभट्टाने दिलेली फुलं तुलेवर वाहून वंदन करीत उजवा पाय उजव्या पारड्यात टाकून वीरबैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले सोनमोहरांच्या ओंजळी डाव्या पारड्यात पडू लागल्या. खणखणत पारड्यात उतरणाऱ्या मोहरा बघताना विचारांची एक ओंजळ कुठूनतरी संभाजी राजांच्या मनाच्या पारड्यात सोडली गेली.-

"आमच्या मासाहेब इथं येतील आणि 'शंभुबाळ' म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात त्यांतील एकच बिल्वपान त्या पारड्यात सोडून आमच्याकडं बघतील तर आमचं पारडं हां हां म्हणता आभाळाला जाऊन थडकेल !!
आता संभाजीराजांनी वीरबैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडू लागले होते. मनात माजलेला काहूरकुठेतरी नाहीसा होत शंभूराजे भानावर आले. त्यानंतर थोरली राणीसाहेब सोयराबाई साहेब यांची सुवर्णतुला पार पडली.

ज्यांच्या शिकवणुकीमुळेच शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे स्वराज्य उभे राहिले ते थकलेले डोळे हा सोहळा आपल्या काळजात साठवत होते अन् मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात आपल्या कुकवाची आठवण काढत पाणी गाळत होते. कारण स्वराज्यसंकल्पक तर खरे शहाजी राजेच होतेना.....


राजांची तुला करण्यासाठी १६००० होन लागले हे हेन्री ओक्झेंडनने नमूद करून ठेवले आहे तर वेंगुर्लेकर डचांच्या वृत्तांतात मात्र १७००० होन लागल्याची नोंद आहे. राजांची सुवर्णतुला झाली तो दिवस होता. २९ मे १६७४.

1 comment:

  1. मराठ्यांच रक्त म्हणजे, तप्त उकळता लाव्हा आहे... जिथे-जिथे सांडले मराठ्यांचे रक्त, तिथे आजही पेटलेला वणवा आहे... मस्तक झुकेल ते फक्त शिवरायांच्या चरणी.... जय शिवराय... " लढणार भगव्यासाठी मरणार भगव्यासाठी"

    ReplyDelete