आंग्र्यांनी फिरंग्यांची केलेली दाणादाण १३ सप्टेंबर १७२०

काळ बदलला होता जिकडे तिकडे मराठी सत्ता आपले शौर्याचे भगवे प्रतिक फडकवत दौडत होती. महराजसाहेबांनी स्थापन आरमाराची रेलचेल  देखील मोठ्या तोऱ्यातचं चालू होती समुद्रावरील शिवाजी समुद्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवत होते. इंग्रजांच्या नाकी दम आणत होते. दि. १३ सप्टेंबर १७२० मंगळवार रोजी कॅप्टन ब्राऊन याच्या अधिपत्याखाली मुंबईकर इंग्रजांची लंडन, व्हिक्टोरिया आणि रिव्हेंज ही लढाऊ जहाजे घेरीयाच्या स्वारीवर निघाली. मिस्टर वॉल्टर ब्राऊनला सर्व कमांडर-इन-चीफची पदवी घेऊन त्याला अ‍ॅडमिरलचा हुद्दा दिला होता.

लंडन हे ४० तोफांचे, चांडोस हे ४० तोफांचे, व्हिक्टोरिया २६ तोफांचे, रिव्हेंज १८ तोफांचे, डिफायन्स हे १६ तोफांचे आणि पेल्हाम हे १६ तोफांचे अशी लढाऊ जहाजे या आरमारात होती.

याशिवाय हंटर या नावाचे एक दुकाठी जहाज, प्रिन्स या नावाचे एक एकाच डोलकाठीचे जहाज या आरमारात होते. 'टेरिबल बॉम्ब' या नावाचे एक बॉम्बफेक करणारे जहाज होते. ह्या जहाजांखेरीज दोन गलबते होती. एक अग्निक्षेपक जहाज होते आणि शिवाय किनाऱ्याला लावण्यास सोयीची अशी अनेक मच्छीमारी होडकी होती.

किनाऱ्यावर उतरणाऱ्या तुकडीत ३५० इंग्रज शिपाई, ८० निवडक शिपाई आणि २००० पेक्षा अधिक खलाशी प्रत्यक्ष लढाईत भाग घेऊ शकतील असे होते.
पण एवढी जय्यत तयारी करून सुद्धा विशेष असे काही हाती लागलेच नाही.

ब्राऊन याने आपले काही सैनिक किल्ल्यावर उतरवले व पुष्कळशी प्राणहानी केली. प्राईम जहाज किल्ल्यापासून बंदुकीच्या गोळीच्या टप्प्याच्या माऱ्यापर्यंत जवळ हाकारले गेले व तेथून प्राईमने  किल्ल्यावर सारखा अग्निवर्षाव सुरु केला; पण किल्ल्यातून त्याचा प्रतिकार तितक्याच जोराने झाला.

शत्रूची जेवढी शत्रूला न नेता येण्यासारखी जहाजे सापडतील ती जाळून नष्ट करण्याचे हुकुम देऊन ब्राऊनने काही जहाजे घेरीयाच्या खाडीच्या तोंडावर पाठविली. ब्राऊनच्या जहाजांनी आंग्र्यांची दोन मोठी जहाजे व कित्येक लहान जहाजे जाळली. शिवाय प्राईमवरून एक अग्निगोलक आंग्र्यांच्या एका लढाऊ जहाजावर पडला, त्यामुळे त्या जहाजावरील एक भरलेली बंदूक पेटून उडाली व आंग्र्यांच्या शूर शिपायांची जवळजवळ एक संबध पलटण ठार झाली. बाकी राहिले ते जखमी झाले.

तरीही आंग्रे हटत नव्हते ! त्यांचा जोर फारच वाढला. इंग्रजांच्या काफिल्यास कान्होजींकडून बराच उपद्रव होऊ लागला. इंग्रजांची प्राणहानी वाढी लागली.
याच सुमारास खेमसावंत वाडीकर ५००० व २०० घोडेस्वारांनिशी आंग्र्यांवर स्वारी करण्यासाठी निघाल्याची बातमी इंग्रजांना कळली; तेव्हा त्यांना जरा धीर आला.

'खेम सावंताने आंग्र्यांच्या मुलखात शिरून राजापूरपर्यंत त्याचा मुलुख बेचिराख केला व राजापूरच्या खाडीत आंग्र्यांची चार लढाऊ गलबते बुडविली.' असे ब्राऊनने २४ ऑक्टोबर १७२० च्या पत्राने कळविले होते.
 इतके होऊनही आंग्र्यांना इंग्रजांच्या हल्ल्याची कदर वाटली नाही.
शेवटी इंग्रजांना या लढाईत अपयशच आले !

- अभिषेक कुंभार

No comments:

Post a Comment