दुसरा राज्याभिषेक


अजून रायगडाच्या महादरवाज्या वरील तोरणं काढली सुद्धा नव्हती तोच. मातोश्री जिजाऊसाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. गडावर सुतककाळ येऊन पडला, तरी कर्तव्यपारायण राजे स्वराज्याची चिंता सदैव हाकत होते. सुतकातच त्यांनी अधिकाऱ्यांसाठी कानुजाबता तयार केला. कवी भूषणचा शिवराज-भूषण ग्रंथही लिहून बाळाजी आवाजी चिटणीस याजकडे दाभोळ वगैरे गावांच्या खोतीसुद्धा मोकासा दिल्याचे व त्या कामावर हुसेन याकुब दळवी याला ठेवल्याचे कळवून त्याचेकडून काम घेण्याची आज्ञा केली.
 
राज्याभिषेकाला प्रचंड खर्च झाला होता. आता राजे तो भरून काढण्याच्या मागे लागले तेही याचकाळात बऱ्याच मोहिमा काढण्यात आल्या त्याचपैकी एक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आण्णाजीपंतांना महाराजांनी फोंड्यावर अचानक छापा घालण्यासाठी रवाना केले. अण्णाजीपंत त्याप्रमाणे कुडाळपर्यंत आले. पण महमदखानाला ही बातमी कळली व तो सावध राहिला. त्यामुळे आण्णाजीपंतांना डाव साधता आला नाही. त्यांना अपयश आले.
जिजाऊ साहेबांच्या मृत्यूमुळे आधीच रायगडावर अपशकुनाची भावना बळावत चाललेली होती. त्यातच प्रतापगडावरील घोड्याच्या पागेला आग लागून महाराजांचे मौल्यवान घोडे जळाले. एक हत्तीही जळून मेला. आणखीही काही दुष्चीन्हे राजवाड्यात अनुभवास आली असे निश्चलपुरी म्हणतात. यानंतर महाराजांनी निश्चलपुरीची भेट घेऊन तांत्रिक पद्धतीने पुन्हा राज्याभिषेक करवून घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार सुदिन, सुलग्न, सुमुहूर्त पाहून निश्चलपुरीने काही जापक मंत्रानुष्ठानास बसविले. त्यांची आसने व वस्त्रे रक्तवर्णी होते. चतुःषष्ठीतंत्राधारे सिद्धारीचक्र सिद्ध करून निश्चलपुरीने महाराजांना सांगितले की, पंधराव्या दिवशी शत्रू हस्तगत होईल. त्याप्रमाणे प्रचीती आली व तुकोराम हस्तगत झाला असे निश्चलपुरी सांगतात.

हा तुकोराम म्हणजे प्रभावळीचा सुभेदारचं असावा डी. ८ सप्टेंबर १६७४ च्या एका पत्रावरून तुकोराम हा राजांशी निष्ठेने वागत नव्हता असे लक्षात येते.
निश्चलपुरीच्या कथनानुसार, तुकोराम हस्तगत झाल्यामुळे निश्चलपुरीच्या मंत्रशक्तीवर राजांचा विश्वास बसला. त्यांनी आपल्या पुरोहितांजवळ निश्चलपुरीकडून मंत्रोपदेश आणि तांत्रिक राज्याभिषेक करून घेण्याबाबत सल्ला मागितला. यावर त्यांनी राजांना सल्ला देताना म्हटले की निश्चलपुरीकडून मंत्रोपदेश न घेता फार तर दुसरा राज्याभिषेक करवून घ्यावा. कारण गायत्र्यूपदेश घेतल्यानंतर आपत्ती आल्या. आता पुन्हा दुसरा उपदेश घेतल्यावर कोणता उत्पात होईल ते कुणी सांगावे!
आणि आनंद नाम संवत्सराच्या अश्विन शुद्ध पंचमीला (काही ठिकाणी तारीख २३ तर काही ठिकाणी २४ सप्टेंबर १६७४)  प्रातःकाळी उठून निश्चलपुरीने कलश स्थापना केली. व पुढील विधी पार पडले.

गागाभट्टानी शुद्ध वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केल्यामुळे तांत्रिक विधीवर विश्वास ठेवाणारा एक गट नाराज झाला परंतू अपशकुनांच्या जाणिवेमुळे सर्वजण गोंधळून गेले होतेच. या सर्वांच्या समाधानासाठी काही अगतिकतेतूनच हा तांत्रिक राज्याभिषेक घडून आला काहीही असले तरी उज्वल भविष्याकडे झेप घेणाऱ्या द्रष्ट्या पुरुषावरही त्याच्या सभोवती वावरणार्‍या सामान्य जणांकडूनचं कशी मर्यादा पडते व प्रगतीचा कसा गतिरोध होत जातो याचे हे तांत्रिक अभिषेक हे उत्तम उदाहरण आहे. ! मज्जा अशी की, या दुसऱ्या राज्याभिषेकानंतर दुसऱ्याच दिवशी प्रतापगडावर पुन्हा वीज पडली.

1 comment:

  1. आधीचे सिंहासन भंग करुन त्या जागी ८ दिशांकडे तोंड केलेले ८ सिंह असलेले दुसरे सिंहासन स्थापन केले गेले. प्रत्येक सिंहाला बळी दिला गेला. ही सर्व कृत्ये काळी अथवा रकतवर्णी वस्त्रे नेसून केली गेली.

    प्रगतीचा गतीरोध वगैरे का म्हणावे? ह्या तत्कालिन समजुती होत्या. त्यातून कोणीच वाचू शकले नाही. तट - बुरुज जर सारखे ढासळत असतील तर एखाद्याला त्यात चिणून नरबळीच दिला जात असे क्वचित गर्भार स्त्रीला सुद्धा चिणत असत. आज तीनशे - सहाशे - हजार वर्षांनी आपल्याला हे ऐकून विचित्र वाटतं पण त्याकाळी ह्या समजूती फार सहज होत्या. महाराज हे समाजाचे भाग होते. त्यांच्या कार्यकालात त्यांच्या परोक्ष अथवा त्यांच्या माहीतीत असं काही घडलं असेल तर त्यात विशेष काही नाही. अखेरीस महाराजही एक माणूस होते. त्यांना त्यांच मन होतं, त्यांना भावना होत्या, त्यांचे भले - बुरे विचार होते, त्यांच्या तत्कालिन समाजानुसार श्रद्धा (व अगदि अंधश्रद्धाही जमेस धरायला हव्यात) होत्या. त्यांना कुटुंब होतं, वैयक्तिक जीवन होतं. हे आपण कधीच समजून घेत नाही. हे एकदा मान्य केलं की पुढच्या अनेक गोष्टी सोप्या होतील.

    मुघलांकदे जाण्यात संभाजीराजांची चूक ही त्यांच्या सळसळत्या रक्ताची चूक होती. डोकं थंड झाल्यावरती एका जीवावरच्या संकटातून ते निसटून परत आले आणि पुढचा ज्वलंत व धगधगता इतिहास आपण सर्व जाणतोच. थोरले महाराज अथवा शंभूराजे "माणसे" होती माणूसच चूका करतो मात्र "महामानव" त्या चूकांची जबाबदारी घेऊन शक्य होईल तेव्हा त्या दुरुस्त करतात व इतिहास घडवतात ... फरक इथून सुरु होतो. :-)

    ReplyDelete