ऑपरेशन ट्रायडंटल
रोजच्या पोटापाण्याची भ्रांत असणाऱ्यांना कसले आलय कुठल्या गोष्टीचं सोयरं सुतक, रोजचा गाडा ओढण्यातच नशिबाला घामाच्या धारा लागतात. पण आजचा प्रसंग काहीसा वेगळा होता. साऱ्या दिल्लीमध्ये सायरन मोठमोठ्यान खणखणत होते. रस्त्यावरून पोलीस व्हॅन सतत सूचना देत होत्या. घरातून बाहेर उजेड येणार नाही एवढ्या खबरदारीनं राहण्याचे ते सांगत होते. ३ डिसेंबर १९७१ ची ती रात्र.
सबंध उत्तर भारतात आगपाखड करत पाकिस्तानी विमानं घोंगावत होती. अंबाला, श्रीनगर, अवंतपूर, पठाणकोट, उत्तरलाईन, जोधपुर पार आग्र्यापर्यंत ही विमानं आत शिरली. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपले सर्व कार्यक्रम स्थगित सर्वत्र होणाऱ्या हल्ल्याची माहिती घेतली. देश कि धडकन असणाऱ्या नव्या दिल्लीत खलबतांना उत आला. इंदिरा बाईंनी तिन्ही दलांच्या सेनापतींना बोलावून घेतले. बराच खल झाला. शेवटी रात्री उशिरा बाईंनी फोन उचलला
पलीकडल्या "येस मॅमला"
अलीकडून "संसार" एवढेच उत्तर दिले गेले.
अलीकडून "संसार" एवढेच उत्तर दिले गेले.
आता सुरवात झाली होती ती एक, भविष्यासाठी दैदिप्यमान ठरणाऱ्या ऐतिहासिक घटनेला. #ऑपरेशन_ट्रायडंटला सुरुवात झाली. भारतीय नौकांचा काफिला कराचीच्या दिशेने निघाला. यात चार मिसाईल बोटी, दोन अद्ययावत फ्रीगेट असा सारा कारभार. शेवटचा हल्ला मिसाईल बोटीच्या गराड्यानं कराचीजवळ जाऊन करायचं नक्की ठरलं होतं. पाकिस्तानच्या "गाझीची" थोडीशी धास्ती होतीच. पण "लढाई करने जा रहे है, मोहब्बतनही" हे माणेकशॉजींचे हे खडे बोल सगळ्यांना कामाला लावणारे होते.
रात्री दहा वाजता नौदलाचे अधिकारी बी. बी. यादव यांनी आपला वायरलेसचा स्वीच ऑन केला. अडमिरला त्यांनी कळविले "आमच्या रडारच्या कक्षेत दोन जहाजं दिसताहेत" पाक नौदलाचे ध्वज जहाज बाबर एका गोदीजवळ नांगरून पडलं होतं. सोबत खैबर शहाजहा बादर आलमगीर, आलमगीर हे देखील तिच्या सोबतीला होते. थंडी होती अरबी समुद्र शांत होता. भारतीय नौदलाच काफिला बाणाच्या टोकासारखा आकार रचून कराचीच्या दिशेने पुढेच पुढे निघाला होता.
बोचऱ्या थंडीला अन शांततेला भंग करत एक भला मोठ्ठा आवाज झाला. पाकिस्तानी वेळेनुसार ती वेळ रात्री पावणे अकराची. किमान तीन एक टन वजनाच्या एक मिसाईलनं पाकिस्तानी खैबरचा वेध घेतला होता. ३५०० टन वजनाचं जहाज काही क्षणातच गटांगळ्या खाऊ लागलं, एका मागून एक बार होत राहिले, वायरलेसहून मदतीसाठीचे मेसेज पाठवण्याची जिकडे तिकडे घाई उडाली होती. पण त्यावेळी पाकिस्तान मनोरा किमारी व मसरूर एयरबेसवरून विमान विरोधी तोफा डागत होतं. आता आपल्यावर विमानानंही हल्ला होईल असा त्यांचा कयास होता.
इकडे खैबरच्या मदतीला येणारा महाफौस जहाजेलाही नौदलानं आसमान दाखवलं. सगळ्यांनीच कावा केला. खैबर बुडविली, उरल्या सुरल्या लहान पाक बोटींचा समाचार घेत भारतीय युद्ध जहाजा अक्षरशः कराची बंदराला लागल्या. किनाऱ्यावरल्या पेट्रोलियमचे मोठमोठे साठे, रिफायनरी सारं काही बेचिराख केलं. दुसरीकडं भारतीय नॅट विमानं मसरुर वर हल्ला करीत होती. एकीकडे भारताच्या नौकादलाने पाकिस्तानी नौकादलाचे कंबरड मोडलं तर दुसरीकडे हवाई दलाने पाकिस्तानी एयर कंट्रोलला हालण्याची संधीही दिली नाही. अशा रीतीनं ऑपरेशन ट्रायडंट सक्सेस झालं देशाच्या मुरब्बी बाईसाहेबांनी बुद्धीबळाच्या पटलावर सोंगट्या फिरवून प्रतिस्पर्ध्याची नाचक्की करावी, तशी अवस्था पाकिस्तानची करून ठेवली होती.
१९७१ ची रोमांचक युद्धगाथा
Khup sundar👌 ashich sundar mahiti tumhi amha-vachakanna det raha
ReplyDelete