जंजिऱ्याला शिड्या उभारणारा लायजी सरपाटील कोळी


समुदाला रत्नाकर म्हणतात. समुदाच्या पोटात अगणित मौल्यवान रत्ने असतात म्हणे. शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुळाजी आंग्रे , दौलतखान , सिद्दी मिस्त्री , कान्होजी आंग्रे , दर्यासारंग इत्यादी देवमासे आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते. खरोखर कोकणात रत्नाकर होता.


आगरी , कोळी , भंडारी , गावित , कुणबी , वगैरे. याशिवाय गलबते बांधणारी कामगार मंडळीही अनेक होती. संगमिरी हा युद्ध गलबताचा नवीनच प्रभावी प्रकार. याच कामगारांनी आरमारात आणला. या साऱ्यांचाच संसारापेक्षा समुद्रावर अधिक प्रेम होते , निष्ठा होती. अन् शिवाजी महाराजांचेही या सर्वांवर अतुल प्रेम आणि अपार निष्ठा होती. महाराजांच्या आयुष्यातील (दि. १९ फेब्रुवारी १६६० ते ३ एप्रिल १६८० ) सर्वात जास्त दिवस महाराजांचे कोकणात वास्तव्य घडले आहे. कोकणच्या भूमीवर त्यांचे आईसारखे प्रेम होते. कोकणातली माणसं त्यांना कलमी आंब्याइतकी , बरक्या फणसाइतकी आणि मिठागरातील खडेमिठाइतकी आवडीची होती. त्यातीलच एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं , लायजी सरपाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा. विलक्षण धाडसी , शूर आणि विश्वासू.

मुरुडचा जंजिरा सिद्द्यांकडून कायमचा काबीज करण्यासाठी महाराजांचा जीव मासळीसारखाच तळमळत होता. जंजिऱ्यावरील एक मोहीम त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांवर सोपवली. मोरोपंत कोकणी आणि घाटी हशमांची फौज घेऊन तळघोसाळे आणि मुरुड केळशीच्या परिसरात दाखल झाले. जंजिऱ्यावरची मोहिम कशी करावी याचे आराखडे ते आखीत होते. पाण्यातली लढाई , कशीही करायची म्हटली तरी अवघडच. मोरोपंत विचार करीत होते.

त्यातच या लायजी पाटील कोळ्याच्या डोक्यात एक मासळी सळसळून गेली. त्याचा मोहिमेचा विचार असा की , जंजिरा किल्ल्याच्या तटालाच समुदातून शिड्या लावाव्यात आणि एखाद्या मध्यरात्रीच्या गडद अंधारात होड्यामचव्यांतून मराठी लष्कर या तटाला लावल्या जाणाऱ्या शिड्यांपाशी पोहोचवावे. अन् मग शिड्यांवरून चढून जाऊन लष्कराने ऐन किल्ल्याच्या आतच उड्या घ्याव्यात. हबश्यांवर हल्ला चढवावा. अन् जंजिरा आपल्या शौर्याच्या लाटेने बुडवावा. ही कल्पना अचाट होती. कोंडाजीने पन्हाळगड घ्यावा किंवा तानाजीने सिंहगड घ्यावा , अशी ही अफलातून कल्पना , लायजीच्या मनात आली. हे काम सोपं होतं की काय ? कारण जंजिऱ्याच्या तटाबुरुजांवर अहोरात्र हबशांचा जागता फिरता पहारा होता.

अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं ? मुळात समुदात शिड्या लावायच्या तरी कशा ? आवाज होणार , हबशांना चाहूल लागणार. होड्यांत शिडी उभी करून तटाला भिडवली की , दर्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार , शिड्या हलणार. वर गनीम जागा असणार. तो काय गप्प बसेल ? त्यांच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्या , र्वच्या , बंदुकांखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड , अशक्यच होता , तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यानरात्री करायचं ठरविलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजविला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं , ' आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही वेगीवेगी मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. '

मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या. जंजिऱ्याच्या तटांवर रास्त घालणारे धिप्पाड हबशी भुतासारखे येरझाऱ्या घालीत होते. लाय पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली , तर ? मरणच.

लाय पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावून होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेचनात. त्या भयंकर अंधारात लायपाटील क्षणक्षण मोजीत होता.

किती तरी वेळ गेला , काय झालं , कोणास ठावूक ? ते इतिहासासही माहीत नाही. पण मोरोपंत आलेच नाहीत. लाय पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळुहळू अंधार कमी होत जाणार आणि ' प्रभात ' होत जाणार. (मूळ ऐतिहासिक कागदांत ' प्रभात ' हाच शब्द वापरलेला आहे.) अन् मग उजेडामुळे आपला डाव हबश्यांच्या नजरेस पडणार. अन् मग घातच! पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं ? लायजीला काही कळेचना. त्याच्या जिवाची केवढी उलघाल त्यावेळी झाली असेल , याची कल्पनाच केलेली बरी.

असा हा जंजिरा

अखेर लाय पाटील निराश झाला. हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारांसह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दु:ख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला , योजना का फसली हे आज कोणालाच माहीत नाही. पण एक विलक्षण आरमारी डाव वाया गेला अन् लायजीची करामत पाण्यात विरघळली.

एका कोळियाने जाळे फेकियले. परि ते वाया गेले.

बाबासाहेब पुरंदरे

Comments

  1. santosh chavhan00:14

    तुझ्यामुळे अजून एक इतिहासात हरवलेले नाव समजले धन्यवाद........ जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  2. nice collection yar i want become member

    ReplyDelete
  3. very good.. Prayatna safal zala asta tar janjiryachi ek khanta aaj apalyala rahili nasti

    ReplyDelete
  4. Anonymous00:46

    धन्यवाद........ जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  5. Datta05:15

    !! जय महाराष्ट्र !!

    ReplyDelete
  6. Mitra, punshch Dhanyawaad...!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब